आठवणींचे मनोरे
"हो.. मी सांगितलं ना तुला,
आले फक्त पाचच मिनिटात.."
ती वेणीत गुंतलेले केस मोकळे करत करत त्याला आश्वासन देत होती.. त्यालाही माहीत होतं ती आता त्याला पाच मिनिटांचा दुरावा देऊन कुठं चालली आहे ते. करण हे फक्त आजच्यापुरतंच मर्यादित नव्हतं त्यांच्या जोडीच्या सहवासाला आता जवळ-जवळ दोन वर्ष होत आली होती. म्हणजे परस्परांच्या सवयी बऱ्यापैकी माहीत होत्या एकमेकांना.
रोज रात्री ती या वेळेला त्याच्याकडून हक्काने पाच मिनिटं मागून घ्यायची आणि अंघोळ करून यायची. हो ती रोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करायची.
त्यानं या वेळेला अंघोळ करण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी तिला बऱ्याचदा लाडीगोडी लाऊन झालेलं पण तिने नव्हतं त्याला कळू दिलं.. पण तोही बिचारा हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याला हे जाणून घेण्यापायी का अजून काय माहिती नाही पण रोज निदा फ़ाज़लींचा एक शेर या वेळी नक्की आठवायचा..
"हर इक आदमी में होतें हैं दसबीस आदमी,
जब भी मिलोगे हर इक से मिलना.."
आणि पुन्हा तो तिला अंघोळीसोबतच बऱ्याच गोष्टी बोलत्या करण्यासाठी चवताळून उठायचा.
पण पुरुषांच्या अशा वागण्याला हॅलो देईल ती बाईची जात कसली?..
म्हणजे याच्या सगळ्या मनातल्या उकळ्यांवर पुन्हा पाणी फेरायचं..
प्रत्येकाच्या संवादाची एक टिपिकल ठरलेली भाषा असते, या जोडप्याची सुद्धा ती होती. आज ती कालपेक्षा, कालपेक्षाच काय नेहमीपेक्षा जास्त परफेक्ट पारंपरिक पेहरावात एकूणच मोहक शब्दाला लाजवेल अशीच दिसत होती.. आणि हे 'त्याच्यातल्या' पुरुषाला न उमगायला तो काही अजून बाल्यावस्थेत नव्हता.. त्याने तिच्याकडं पाहून ते धुंद करणारं रूप डोळ्यांत सामावून घेऊन न बघितल्यासारखं करत खिडकीतून बाहेर कोरड्या शुभ्र आभाळाकडे पाहत बोलून गेला..
"आज ढग खूप दाटून आलेत.. नाही??"
तिला उमगलं होतं, आभाळ कोरडं असतांना नेमके कोणते ढग भरून आलेत ते.. तिने प्रश्नाचा ओघ समजून घेऊन तुळशीला पाणी घालत घालत केसांच्या बुचड्यातुन बाहेर आलेली बट हळुवारपणे कानावर सरकवत उत्तर दिलं..
"हो. कदाचित त्यांना आज रितं व्हायचं असावं,
त्यांना खुप दिवसांच ओझं हलकं करावं वाटत असेल म्हणून.."
त्यालाही कळून चुकलं की आपण ज्या ढगांबद्दल बोलतोय नेमके तेच ढग आज रिते होणार आहेत बहुतेक..
त्या पेहरावातल्या मोहक अदांची नोंद घेत घेत दिवस कसा ढळला हे दोघांनाही कळलं सुद्धा नाही.
रोजच्याप्रमाणे पाच मिनिटांसाठी ती त्याच्याकडून बाजूला गेली होती, या दरम्यान तो या विचारांमध्ये डुंबून गेला होता की 'ढग आतापर्यंत रिते झाले नाहीत' कदाचित आता तरी व्हावेत ही आशा..
ती येताच तो अजून बेभान होऊन त्याच आवेशात पुन्हा तिला विचारू लागला..
"ढग अजून रिते झाले नाहीत..?"
पुन्हा त्या प्रश्नाचा ओघ समजून घेऊन तिने एक मिश्किल हसू ओठांवर आणत त्यालाच प्रतिप्रश्न केला..
"आज विचारणार नाहीस अंघोळीमागचं राज?"
"खरं सांगू, मला ना दिवसभर थकलं-भंगलेलं शरीर तुझ्या हवाली करू वाटत नाही.. स्वतःला नितळ करून मला तुझ्यात विरून जायला आवडतं.. म्हणून मी रोज तुझ्या हक्काचे पाच मिनिटं घेऊन अंघोळ करायला जाते. आणि ही माझी आवड मी जन्मभर जपणार आहे!"
या उत्तरावर त्याला तिला मिठीत घेऊन स्वतःमध्ये सामावून घेण्याशिवाय दुसरं काही सुचलंच नाही..
©माऊली
१.४.२०.
अप्रतिम...
ReplyDeleteवाचतांना असे वाटत होते की... एका नवऱ्याच्या मनातील काहूर किती आतुरतेने तो मांडत आहे.
ReplyDeleteखरच छान लिहिले आहेस
यासाठीच केला होतास अट्टाहास, ज्याला व्यक्त होता येते त्याच्याकडे विचारांची आणि शब्दांची कमी नसते तुझी ही संपत्ती अशीच वाढो
ReplyDeleteअसेच व्यक्त होत रहा खूप मस्त
ReplyDeleteछान लिहिलय.... मस्त 🦋
ReplyDeleteपण improvement la scope ahe thoda😉
Chan lihilay mauli......asach lihit raha....tuzya shabdanna vyakt krt raha
ReplyDelete