"रात्रंदिनं आम्हां युद्धाचा प्रसंग.."

"रात्रंदीनं आम्हां युद्धाचा प्रसंग.."
                                  - संत तुकाराम

आपण रोजच्या जगण्यात जर उघडे डोळे ठेऊन वावरत असलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात किंवा याची जाणीव होऊन जाते की काहीतरी वेगळं म्हणजे जसं घडायला पाहिजे होतं तसं न घडता वेगळं काहीतरी घडतंय जे अपेक्षित किंवा सगळ्यांच्या सोयीचं नाही. माझं गाव सुद्धा याला अपवाद नाही. जे डोळ्याला दिसेल तिथं काम करायला वाव आहे. ते फक्त सरकारी यंत्रणेनंच केलं पाहिजे असा आपला हट्ट असेल तर मला वाटतंय आपण मागच्या दिशेने प्रवास करतोय. आपल्याला दिसतंय, आपण करू शकतोय आणि आणि केल्यानंतरचे परिणाम हे 'चांगले' असणार आहेत तर ते तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही केलं पाहिजे. यात सामाजिक जाणिव, देणं लागतो वगैरे फुसके वाक्य बोलून काही पदरी पडणार नाही. जे होईल ते आपल्याच सोयीचं होणार आहे फक्त एवढया अपेक्षेने केलं तरी काही न काही होऊन जाईल.
लॉकडाऊन मूळ कामं धंदे सोडून गावी घरी बसलेल्यांपैकी मी पण आहे. फेसबुक व्हाट्सएप स्क्रोल करतांना बहुतांश जणांच्या पोस्ट ह्या इतरांचा धीर वाढेल अशा आशयाच्या कमी आणि उदासवाण्याच जास्त दिसायच्या. बुद्धीला आणि हाताला काही काम नसल्याने त्यात त्यांचाही एवढा दोष आहे असं म्हणता येणार नाही. पण खूप कमी लोकं डिजिटल मध्यम सोडून ग्राउंड वर काम करतांना दिसली. मी शेतकरी माणूस, खेड्यात राहत असल्याने शेतीची मशागत, पेरणी हे असे कामं करत बरेच दिवस निघून गेले आणि दिवसांसोबत गावातील लोकांच्या बुद्धीतला जो थोडंफार विवेक जागा होता तोही निघून जाऊ लागला. त्याला कारणीभूत घटक बघायला गेल्यास अवतीभोवती जे काही चाललंय त्याची खरी आणि नेमकी माहिती कमी आणि सावळा गोंधळ जास्त कानी पडत असल्याने हे जे कानावर पडेल, डोळ्याला दिसेल तेच खरं मानून चुकीच्याच गोष्टींत जास्त तऱ्हा करून आपल्या बुद्धीचा विवेक गमावून बसलेले दिसू लागले. गावात खूप अशी कामं आहेत जी आपण करू शकतोय असं दिसतंय.. पण लोकांचा एकमेकांमधला तुटलेला संवाद, तू असशील तुझ्या घरचा शहाणा, आम्हाला काय करायचंय ही अशी मानसिकता पावला-पावलावर आडवी येतेय त्यामुळं काही छोट्या छोट्या पण सगळ्यांच्या हिताच्या गोष्टी करायला इच्छा असूनही अडचण येते.
या गोष्टी टोकाला तेंव्हा गेल्या ज्यावेळी आम्ही गावात देशी झाडांची लागवड करण्यासाठी ग्राउंड वर काम करायला पुढं आलो.
झालं असं की, आम्ही आमच्या परिसरातील काही झाडांच्या बियांचे बीजगोळे (seedball) तयार करून त्यातून रोपे तयार केली. फांदी लावल्यावर जी झाडं उगवतात उदा. वड, नांदूरकी.. त्यांची सुद्धा छोटे छोटे कोंब फुटलेली झाडं तयार केली आणि एक दिवस गावातले पब्जी स्टार, टिकटॉक स्टार, फेसबुकवर धुररररर करणारी जमात या सगळ्यांना गोळा करून त्यां रोपांची लागवड करण्याचा बेत आखला. जवळपास २५० झाडांच्या रोपांची लागवड आम्ही केली. त्यात कडुनिंब, वड, पिंपळ, नांदूरकी, आंबा, चिंच, बाभूळ, सायतुक, खोसला, बिबे अशा काही झाडांचा समावेश होता.
हे सगळं केल्यानंतर बरोबर सोळाव्या दिवशी गावातील काही सो कॉल्ड शहाण्या माणसांनी मला बोलावून घेतलं आणि देवीच्या मंदिराशेजारी लावलेली काही झाडं उपटून दुसरीकडे लावण्याचा सल्ला नाही आदेश दिला. मी त्याची कारणं विचारल्यावर मला त्यांना हाणावं वाटत होतं पण ते 'शहाणी' असल्यानं मी स्वतःला आवरलं. त्या कारणांचा उल्लेख इथंही केला असता पण त्या २-४ नालायक शहाण्या माणसांमूळ मला माझ्या गावची अजून जास्त घालवायची नाही. त्यांना मी पद्धतशीर त्या झाडांच्या फायद्या तोट्याच्या चारही बाजू समजावून सांगण्यात यशस्वी झालो, त्या शहाण्यांना घरी नेऊन चहा पाजला आणि मला जे साध्य करायचंय ते करून घेतलं. ती झाडं आता मोकळा श्वास घेऊन त्यांच्यासोबतच माझं जगणं सुद्धा सोयीचं करायला मदत करतील.
अशीच गोष्ट जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांच्या शिकवण्याबद्दल पण घडली. आमच्या गावात चौथीपर्यंतच शाळा आहे. एकूण विद्यार्थी संख्या अठरा. विचार केला की शाळा चालू होईपर्यंत आपणच यांना काहीतरी शिकवावं. शिकवायचं म्हणजे काय तर तेच जे हे अगोदर शिकलेत पण  रोज दोन तास यांना बसवून घेऊन त्यांच्याकडून त्याचंच रिविजन करून घ्यावं. ते काहीतरी म्हणजे किमान इंग्रजी बाराखड्या, उजळणीचे पाढे, शुद्धलेखन किमान एवढं तरी.
याबद्दल आम्ही तिघेजण जे स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ते ज्यांची मूलं शाळेत आहेत त्यांच्या पालकांना भेटलो. जवळपास अर्ध्याच्या वर पहिल्याच भेटीत त्यांच्या पोरांना शाळेत पाठवायला तयार झाले पण बाकीच्यांना आमच्यावर विश्वास नव्हता. किंवा अजून उघडपणे बोलायचं झालं तर त्यांची मानसिकता अशी होती की, "यांना काय कळतंय म्हणून हे आपल्या पोरांना शिकवणार, दोन रुपयांची नोकरी लागली म्हंजी कुणी एवढं शहाणं होत नसतय.." सुरुवातीला आम्ही जेवढे स्वखुशीने आले तेवढ्यांनाच शिकवत गेलो. नंतर हळूहळू मित्राच्या मैत्रिणीच्या सोबतीने जे येत नव्हते तेही यायला लागले. 'फक्त दोनंच तास शाळा आणि रोज शाळेत दोन-दोन चॉकलेट' यामुळं बऱ्यापैकी जणांना ही शाळा आवडू लागली. आम्हां तिघांपैकी एकजण त्याच्या कामासाठी गावाबाहेर निघून गेला. सध्या आम्ही दोघेच दिवसातले दोन तास देऊन हे सध्या तरी सुरळीत चालवतोय. पुढं कधी काय अडचण येईल माहीत नाही.
अजून बरेच कुटाणे केलेत. संपादकांनी संधी दिल्यास पुढच्या अंकात त्यांच्याबद्दलही बोलू.

या संकट काळात आपल्याला खूप अडचणी आल्या खूप त्रासही झाला. पण ज्यांना घेता आलं त्यांना याच काळाने खूप काही दिलंय सुद्धा. प्रत्येकाच्या आवडी-निवडीनुसार कुठंल्याही क्षेत्रात कामं करायला खूप वाव आहे आणि भयंकर अडचणी सुद्धा आहेत पण त्याबद्दल फक्त विचार करत बसण्यापेक्षा ग्राउंडवर उतरून काम केल्यास आपोआप उपाय सापडतात हे मी अनुभवलंय. शांत बसून वेबसिरीज बघून, फेसबुक पेजवरच्या लाईव्ह अटेंड करून किंवा वेबिनर अटेंड करून काही मिळवता येत असेलही पण मला तरी त्यातून काही ठोस मिळेल असं वाटत नाही.
म्हणून मी तिकडं कमी आणि 'इकडं' जास्त असतो.
शेवटी आपली जिंदगी आपण लोकांच्या सल्ल्यानुसार का जगायची ना? आपल्याला पटतंय ते करू की..

- ज्ञानोबा संगीता शेषराव फड
मु. कड्याचीवाडी जिल्हा. परभणी
संपर्क :-
मो - ७७४४८२११००
इमेल - dnyanoba.phad9797@gmail.com

Comments

Popular posts from this blog

#यादें.. भाग-३

सोचो, खुश रहो..

#यादें.. भाग-२