#आठवणींचे मनोरे..
वेळ काळाइतकं कुणीच कठोर नसतं. आजकाल ही गोष्ट जरा जास्तच तीव्रतेनं कळायला लागलीय. तुला जाऊन कालपरवा २ वर्ष उलटून गेली. अजूनही काळजावरच्या सुरकुत्या तुझा चेहरा आठवला की सर्रssकन् निघून जातात. आणि मी पुन्हा त्याच विचारांत गुरफटून जातो की असं काय आहे तुझ्या आठवणींत? ज्यामुळं माझ्यातला एकदम ढालाढिला माणूस पूर्ण उत्साहात येऊन तुझ्यातच विरून जातो. विचार थांबत नसतात माणसाचे, वावटळीत उडालेल्या पाचोळ्यागत ते कुठवरही धावतच राहतात म्हणून मी सतत आवरायचा प्रयत्न करतो तुझ्या बाबतीत येणाऱ्या विचारांना. पण होतं एकदम उलटंच. मी करत असलेला थांबवायचा केविलवाणा प्रयत्न गुरफटून जातो पुन्हा येणाऱ्या आठवांच्या वादळात. अशा वेळी कसं जगावं माणसानं? नको नको म्हणून दाबून धरायचा प्रयत्न केल्यावर एकदम उसळीच येते त्यांना.
तुझ्या जाण्यानं मला एक गोष्ट अजून नकळत उमगून गेली. रात्रीवर प्रेम करावं माणसानं. हीच ती. शब्द, आवाज, दृश्य, वेळ, निसर्ग, कल्पना, हे सगळं बोलू लागतात आपल्यासोबत रात्रींत. आणि एकंदरीतच आयुष्य म्हणजे इंद्रधनू अन तसलं औघड असं काही नसून मोकळ्या हवेत तुझ्या हातात हात घालून बसावं बस एवढीच अपेक्षा असते. मला माहिती आहे ती आता पूर्ण होणार नाही पण..
पण.. साला हे पणच जात नाहीये तुझ्या माझ्यातून. हे नसतं तर सजीव सृष्टीवरचा सगळ्यात आनंदी जोडा असता आपला. तूच म्हणली होतीस असं. माझ्याही मनात होतं हे पण तुझ्यापुढं बऱ्याच गोष्टी बोलायच्या राहून गेल्या त्यातलीच ही एक. तू घेतलं असचिल समजून हे माझं न बोललेलं बोलणं. पण माझ्या मनात ते अजून तसच कुजत पडलंय. मनात आलेल्या गोष्टी बोलून जाव्या माणसानं. वेळ फार क्रूर असते. असो.
चंद्र आजकाल लैच चमकाय लागलाय. सहजच तुझा dp बघायला गेलो तर तू त्याच्या पेक्षा हजार पट चमकत होतीस. हे फुसकं नाही. मनातून बोलतोय मी. आणि मी हे असं बोलत राहणार कारण किती गोष्टींचा पश्चाताप करू अजून. वेळ होती त्यावेळी तर बोललोच नाही काही. इथून पुढं तरी तसं करायला लागू नये म्हणून.
एकच विचार नसतो ना आपल्या काळजात.. कोणत्या कोणत्या गोष्टींना म्हणून न्याय द्यावा. मागं पुढं पडणारी पावलं, अंगातला कण न कण, सहवासात असलेल्या प्रत्येक गोष्टींकड बघणारी नजर, काळजात येणारा प्रत्येक विचार, जाणवत असलेल्या सर्वकाही अस्तित्वाची खंत या सगळ्यांची कमी तू आणि तूच आहेस याचा पुन्हा पुन्हा भास होतोय.
मी चुकत तर नाहीये ना?
भीती वाटतेय ग मला..
~ माऊली
०६ मे २०२०
११:४९ pm
Comments
Post a Comment